अपरांत
स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे अपरांतचे मुख्य उद्दिष्ट्य आहे
अपरांत... कोकणामध्ये पर्यावरण पूरक उद्योग निर्मितीसाठी प्रयत्नशील असणारा ग्रुप. अपरांतच्या कामाची संकल्पना सह्याद्री निसर्ग मित्र या निसर्ग संरक्षण संवर्धन क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या कामामाधूनच झाली. कोकणातील ग्रामीण भागामधील बहुसंख्य रहिवासी अल्पभूधारक आहेत व त्यांना रोजगाराचे ठोस साधन नाही. त्यामुळे येथील लोकांचे जीवन मासेमारी, तुटपुंजे शेती उत्पादन, लाकूड व इतर निसर्गतः उपलब्ध वस्तूंवर अवलंबून आहे. त्यामुळे रोजगारासाठी शहराकडे जाणे अथवा गावामधील अल्प उत्पन्नावर गुजराण करणे क्रमप्राप्त असते. नैसर्गिक स्रोतांवरील दाब कमी करण्यासाठी निसर्ग संवर्धन कामाला आर्थिक उत्पन्नाची जोड दिली तर हे काम आपोआपच यशस्वी होवू शकते, याचा अनुभव संस्थेच्या कासव संरक्षण संवर्धन प्रकल्पामधून आला. संस्थेतर्फे आयोजित कासव महोत्सवाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास सारख्या दुर्गम खेड्यामध्ये पर्यटनातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले व स्थानिक लोक कासव संरक्षणाच्या कामात कायमस्वरूपी जोडले गेले. सध्या हे काम रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा विविध प्रकारच्या उद्योगांच्या संधी प्रत्यक्षात उतरून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे अपरांतचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. अपरांत हा ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारा ग्रुप असून कोकणामध्ये उद्योग सुरु करण्यास स्थानिक लोकांना प्रोत्साहित करणे, उद्योग उभारण्यास मदत करणे तसेच उद्योग-व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे अशा प्रकारचे काम ग्रुप तर्फे करण्यात येत आहे. सध्या अपरांतच्या पुढाकारातून निसर्ग पर्यटन, होम स्टे, धूप कांडी, खाद्यपदार्थ उत्पादन यासारख्या व्यावसायिक प्रकल्पांची यशस्वी वाटचाल सुरु असून या कामामध्ये स्थानिक लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे