पर्यटन

पर्यावरण व्यवसाय

सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पुढे डोंगर दऱ्यांमधील सदाहरित वनराजीं ते खारफुटीच्या जंगलांमधून वाट काढत विस्तीर्ण खाडीरुपात समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या निसर्गरम्य परिसरात कोकण वसलेले आहे. जगभरातील पर्यटकांसाठी आदर्श ठरावेत अशा स्वच्छ, सुंदर, प्रशस्त व सुरक्षित समुद्र किनाऱ्यांची देणगी कोकणाला लाभली आहे. निसर्ग निरीक्षणासाठी वैशिष्ठ्यपूर्ण पक्षी, प्राणी तसेच नटलेला प्राचीन ऐतिहासिक स्थळांपासून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गडकिल्ले, जलदुर्गांचा गौरवशाली वारसा अभिमानाने मिरवणारा कोकण धार्मिक स्थळे, कृषी-फळबागा, मासेमारी उद्योग, पारंपारिक कला, स्वच्छ परिसर असणारी जांभा दगडाची टुमदार घरे व चविष्ट खाद्यसंस्कृती अशा विविधांगी प्रकारांचा आस्वाद घेण्यासाठी, त्यांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आंबा-फणसांनी बहरलेला उन्हाळा, धुंदकुंद खळाळता पावसाळा व निसर्गरम्य हिवाळा अशा तीनही ऋतुंमध्ये पर्यटकांना सारखाच आनंद देणे हे कोकणाचे मुख्य वैशिष्ट्य... या अनायासे लाभलेल्या देवदुर्लभ वैभवाचे जतन करण्यासाठी येथील भूमिपुत्रांना आर्थिक बळ मिळावे व त्यामधूनच येथील निसर्गाचे संरक्षण-संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरण पूरक पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी “अपरांत” तर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. कोकणच्या निसर्ग वैभवाची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी गावोगाव पर्यटक मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) तयार व्हावेत यासाठी अपरांत तर्फे स्थानिक तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.

होम स्टे

कोकणातील निसर्गरम्य खेड्यात राहणे हा सुखद अनुभव असतो. स्वच्छ, सुंदर परिसर, जांभ्या खडकातील रेखीव बांधकाम असलेली घरे, सारवलेले प्रशस्त अंगण मुबलक पाणी व शांत असलेल्या घरांमध्ये राहून कोकणी पदार्थांचा पाहुणचार घेणे ही एक पर्वणी आहे. कोकण म्हणजे समुद्र किनाराच नाही तर आतील भागातील खेड्यातही राहण्याचा वेगळाच अनुभव असतो यासाठी काही खेड्यामध्ये पर्यटकांसाठीची व्यवस्था व्हावी यासाठी अपरांत तर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यातील वीर व चोरवणे या गावांमध्ये पर्यटकांच्या राहण्याची, जेवणाची सोय स्थानिकांच्या घरातच म्हणजे “होम स्टे” या संकल्पनेनुसार करण्यात येत आहे. “होम स्टे” साठी या दोन्ही गावांमध्ये पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कोकणात इतर गावांतूनही याप्रमाणे व्यवस्था करण्यासाठी अपरांत तर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.
हौशी पर्यटकांनी मासेमारी, शेती बागयतीच्या कामांमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद लुटावयाचा, जल पर्यटन, निसर्ग निरीक्षणावर आधारित पर्यटन अशा अनेक मार्गांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अपरांत तर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.