धूपकांडी व्यवसाय
धूपकांडी व्यवसायातून रोजगार निर्मिती
कोकणात छोटे छोटे पर्यावरणपूरक उद्योग सुरु व्हावेत व रोजगाराची निर्मिती व्हावी, या करिता स्थानिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गावागावांतून जनजागृती करण्याचे काम संस्थेतर्फे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये गावांतील इच्छुक लोकांना विनामूल्य व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते तसेच सदरच्या व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी साधन सामुग्रीही पुरविली जाते. संस्थेच्या “अपरांत” केंद्रातर्फे चिपळूण व खेड तालुक्यातील काही गावामधील महिला बचत गटांना त्यांच्याकडील सहज उपलब्ध साहित्यांच्या सहाय्याने गाईच्या शेणापासून सुगंधी धुपकांडी तसेच इतर पूरक उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व उद्योगासाठी साधनसामुग्रीही पुरवण्यात आली. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते व मोरवणे येथील महिला बचत गटांनी हे काम सुरु केले आहे. बांबू, गवत, कृषीसंबंधीत दुय्यम उत्पादने यासारख्या गावांमधील उपलब्ध साधन सामुग्रीच्या सहाय्याने विविध खाद्यपदार्थ तसेच शोभेच्या वस्तू, बॅग्ज, पर्स इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा “अपरांत” चा प्रयत्न आहे. गावातील टाकवू प्लास्टिक पासून शोभेच्या अथवा दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्याचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे.