अपरांत ग्रुप आणि प्रोजेक्ट
कोंकणातील औद्योगिक स्थिती
समृद्ध निसर्ग वैभवाने नटलेल्या व उत्तुंग ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोकण भूमीला अपरांत म्हणूनही ओळखले जाते. पूर्वेकडील सह्याद्री पर्वत व पश्चिमेकडील अमर्याद सागर यांच्या मध्ये असणाऱ्या या नितांत सुंदर प्रदेशामध्ये राहणारे लोकही तसेच निर्मळ, निसर्गप्रेमी, समाधानी आहेत. परंतू वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण व त्याचबरोबर बदलती जीवनशैली यामुळे कृषिप्रधान राहणीमानात खूप बदल होत गेला. आरोग्यसेवा, शिक्षण, दळणवळण यासारख्या जवळजवळ निःशुल्क होत असलेल्या बाबींवरील खर्चामध्ये कल्पनातीत वाढ झाली. पूर्वी गावातील कृषी उत्पन्न, लाकूड, पाणी उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या सहाय्याने लोकांच्या खूपशा गरजा गावामध्येच भागत होत्या. सहाजिकच आर्थिक गरजा भागविण्यासाठी इतर काही साधने नसल्यामुळे नैसर्गिक स्र्तोतांचा वापर मोठ्याप्रमाणात करणे अनिवार्य ठरले. त्याचबरोबर कोकण भागामध्ये अल्पभूधारकांची संख्या जास्त असल्याने वाढत्या गरजा भागविण्यासाठी कृषी उत्पन्न तुटपुंजे पडू लागले व ग्रामीण भागातील लोकांना शहराकडे स्थलांतरित होणे क्रमप्राप्त झाले. यामधूनच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड, विविध प्राणी यासारख्या नैसर्गिक स्र्तोतांचे व्यापारीकरण झाल्याने त्यांची प्रचंड प्रमाणात हानी झाली, शहरांवरील लोकसंख्येचा दाब वाढला. बदलत गेलेल्या जीवनशैलीला पर्याय राहिला नाही परंतू ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाला तर स्थानिकांचे स्थलांतर काही प्रमाणात थांबेल व त्यामुळे नैसर्गिक साधनसामुग्रीची लुट कमी होईल व शहरांवरील लोकसंख्येचा दाबही कमी होईल या उद्देशाने कोकणामध्ये पर्यावरण पूरक उद्योग सुरु करण्याचे व विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम संस्थेतर्फे हाती घेण्यात आले आहे. सुंदर समुद्र किनारे, विस्तीर्ण खाड्या, नद्या, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, हिरवाई पांघुरलेला व वैशिष्ठ्यपूर्ण पक्षी, प्राणी, वनस्पतींनी नटलेला कोकणचा स्वच्छ परिसर पर्यटन व्यवसायासाठी आदर्श आहे. त्याबरोबरच मुबलक पाणी व सुपीक जमीन लाभलेल्या कोकणामध्ये कृषी व बागायती उत्पन्न, मत्स्य अशा अनेकविध उद्योगालाही पोषक वातावरण आहे. कोकणाला लाभलेल्या निसर्गसमृद्धींचा उपयोग करून येथे पर्यावरण पूरक उद्योगधंदे निर्माण व्हावेत व त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी संस्थेच्या “अपरांत” केंद्रातर्फे काही गावांमध्ये उद्योग तसेच व्यवसाय प्रशिक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. उद्योग सुरु करण्यासाठी गावोगाव भेटी देऊन स्थानिकांना उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहित करणे, उद्योग उभारण्यास मदत करणे तसेच उद्योग व्यावासायासाठी प्रशिक्षण देणे अशा प्रकारे सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून त्यामध्ये लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत अपरांत तर्फे सुरु करण्यात आलेल्या वेळास पर्यटन, वीर, चोरवणे होम स्टे., मोरवणे कालुस्ते येथील व्यावसाईक प्रकल्पांची यशस्वी वाटचाल सुरु आहे.